शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मागील काही दिवसापासून नगर शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अज्ञात लोकांकडून धमकी पत्र पाठवण्यात येत आहेत.

यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजते आहे की काय ?

असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे या प्रकाराची सखोल तपास करण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊन केली आहे.

यावेळी काळे यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खालील सय्यद, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, महासचिव इम्रान बागवान, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, काही राजकिय पक्षांच्या व सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या नावे पाठविण्यात आलेल्या निनावी धमकी पत्रांमध्ये देशातील महापुरुषांच्या बद्दल अत्यंत चुकीचे शब्द लिहीत समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न सदर धमकी पत्रांमधून होत असल्याचे दिसते आहे.

या धमकी पत्रामधील मजकूरा विषयी शहरामध्ये नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नगर शहरामध्ये यापूर्वी अनेक वेळा जातीय व धार्मिक दंगली झालेल्या आहेत. हा इतिहास राहिलेला आहे. या धमकी पत्रांमधून विविध जाती-धर्माच्या तसेच वेगवेगळ्या समाज समूहाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न यातून होताना दिसतो आहे.

यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, या माध्यमातून नगर शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचे कटकारस्थान शिजते आहे की काय हा सवाल उपस्थित होत आहे.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून अशा चुकीच्या गोष्टींमुळे जर भविष्यात वेगवेगळ्या धर्मामध्ये व समाजामध्ये तेढ निर्माण झाली तर याला विपरीत वळण लागत दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निनावी धमकी पत्र पाठवणारी विकृत माणसे नेमकी कोण आहेत ?

त्यांचा यामागील हेतू काय आहे ? याचा कसून तपास करत संबंधितांना लवकरच जेरबंद करत त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र आले होते.

त्यावेळी काँग्रेसने राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली होती. सामाजिक क्षेत्रातील इतर व्यक्तींना देखील असेच धमकीचे पत्र प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत अनेक सवाल उपस्थित करून सखोल तपसाची मागणी केली आहे.