जामखेड पं.स. सभापती निवडीचा तिढा सुटणार?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जुलै महिन्यात जामखेड पंचायत सभापतीपदाची निवड प्रक्रिया झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात आला नव्हता.

आता या संदर्भात दाखल करण्यात आलेली पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर यांची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापती पदाच्या निवडीचा निकाल घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जामखेड पं.स. सभागृहात दि.१५ ऑक्टोबर रोजी सभेची नोटिस जारी केली आहे.

या सभेच्या पिठासन अधिकारी पदी कर्जत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून पंचायत समिती सदस्यांना सभेच्या नोटिस जारी करण्यात आल्याची माहिती महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिलापाटिल यांनी दिली. जामखेड पंचायत समिती सभापती पदाचा तिढा मागील नऊ महिन्यांपासून कायम आहे.

पंचवार्षिक निवडणूकीनंतर जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या टप्प्यात अनूसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत होते. सुभाष आव्हाड यांनी अडिच वर्ष सभापती पद भूषविले. हा कार्यकाळ संपत असताना पुढील अडिच वर्षाच्या मुदतीसाठी जिल्हयातील सर्व पं.स. सभापती पदांच्या आरक्षण सोडतीची

सभा डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृहात संपन्न झाली. यावेळी जामखेड पं.स. सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत झाले. मात्र, या प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविले. त्यानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पद निश्चीती झाली.

या निवडीची सभा निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांच्या निगराणीत जामखेड पं.स. सभागृहात संपन्न झाली. मात्र, एकही नामांकन नसल्याने सभापतीपद रिक्त राहीले. उपसभापती पदी मनिषा रविंद्र सुरवसे यांची निवड झाली. सभापती पदाचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविले.

त्यानुसार महिला प्रवर्गासाठी सभापती पद निश्चीत झाले. ३ जुलै रोजी निवडीची प्रक्रिया जामखेड पंचायत समिती सभागृहात पिठासन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या निगराणीत संपन्न झाली. दरम्यान, पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर यांनी या प्रक्रिये संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

न्यायपिठाने त्यावर सुनावणी दरम्यान निवड प्रक्रियेस मुभा देत निकाल घोषित करण्यास मनाई केली होती. यावेळी सभापती पदासाठी राजश्री सूर्यकांत मोरे व मनिषा रविंद्र सुरवसे यांचे नामांकन अर्ज दाखल झाले. मतदान प्रक्रिया देखील संपन्न झाली. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल घोषित केला नाही.

आता ५ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाच्या आदेशानुसार सभापती पद निवडीचा निकाल घोषित करण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी सभा बोलावली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24