अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ.विखे पाटील म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे.
थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपाचे सर्व कार्यकर्ते वीज ग्राहक शेतकरी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करतील.
गावपातळीवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाना टाळे ठोकून, वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील असा इशारा आ.विखे पाटील यांनी दिला. मागील भाजप सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही.
भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली गेली.थकबाकी वाढली तरी तो अर्थिक भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. वीज कंपन्यांची परिस्थिती सुध्दा चांगली होती.
पण आघाडी सरकार सतेवर आल्यानंतर नेमकी वीज वितरण कंपन्यांची परीस्थीती बिघडली कशी? असा सवाल आ.विखे यांनी उपस्थित केला. कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही.
विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या मानसिकतेत नसल्याकडे लक्ष वेधून आ.विखे म्हणाले की, अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची महाविकास आघाडी सरकारची घोषणाही कृतीत उतरली नाही.
यापुर्वी ग्राहकांना आलेल्या जादा रकमेच्या बीलांची होळी करुन सरकारला इशारा दिला होता. याची आठवन करुन देत, कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही प्रत्यक्षात आले नसल्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून १०० युनिट पर्यंत मोफत विज देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करणार असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.