नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत  – भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेक पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रविवारी (दि. 4) रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद केली आहे. खेड-भिगवणमार्गे वाहतूक करण्याचे प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे.

चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, नगर व पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिद्धटेक पुलावरून पाणी वाहू लागल्याने येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रविवारी रात्रीपासून दौंड येथून एक लाख 91 हजार 788 क्‍यूसेक वेगाने पाणी वाहत असून, भीमा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. दौंड येथे 504 मीटर ही धोक्‍याची पातळी आहे. सध्या 505.950 मीटरने धोक्‍याची पातळी ओलांडून नदी प्रवाह वाहत आहे.

रविवारपासून पुराच्या पाण्यात प्रचंड वाढ झाल्याने उजनी धरण पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. सध्या उजनी धरण साठ्यात 67.60 टक्के वाढ झाली आहे. सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील वाहन तळ, शौचालय हे पाण्याखाली गेले आहेत. परिसरातील नदीकाठच्या शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24