मुंबई: शरद पवार यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट विधानभवनात घेतली. दाेन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली.
‘जळगावातील सिंचन प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी आपण काल पवारांची व आज ठाकरेंची भेट घेतली. मी भाजप नव्हे, तर पक्षातील दाेन- तीन नेत्यांवर नाराज आहे. पक्ष साेडण्याचा किंवा शिवसेनेत जाण्याचा अद्याप तरी विचार नाही,’ असे खडसेंनी बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
‘मी मंत्री असताना औरंगाबादेत गाेपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला मंजुरी दिली हाेती. मात्र मी पदावरुन पायउतार झाल्यानंतर मागच्या सरकारकडून या स्मारकाच्या उभारणीबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आता नव्या सरकारने हे स्मारक मार्गी लावावे.
१२ डिसेंबर राेजी गाेपीनाथ गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबत घाेषणाही करावी, अशी मागणी आपण ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनीही या स्मारकासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले,’ अशी माहिती खडसेंनी पत्रकारांना दिली.
संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. दाेघांमध्ये सुमारे तास- दीड तास चर्चा झाली हाेती.