नवी दिल्ली: भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी साेमवारी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दाेन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३० मिनिटे बंद द्वार चर्चा झाली.
पक्षात मिळणारी दुय्यम वागणूक व भाजपमधील लाेकांकडून मुलीचा झालेला पराभव याबाबत खडसेंनी पवारांकडे मन माेकळे केले. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘पुढील’ चर्चा करण्याचा सल्ला पवारांनी खडसेंना दिला, त्यानुसार खडसे मंगळवारी ठाकरेंना भेटणार आहेत.
खरे तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी खडसे दिल्लीत गेल्याची चर्चा हाेती. मात्र प्रत्यक्षात स्वपक्षीय एकाही नेत्याला न भेटताच ते परतले. पत्रकारांशी बाेलताना खडसे म्हणाले, ‘जळगावातील पाण्याची याेजना केंद्रीय जल अायाेगाकडे रखडली हाेती, त्याला आजच मान्यता मिळाली. परंतु केंद्राची मंजुरी अद्याप बाकी आहे.
त्यामुळे आपण पवारांची भेट घेतली. त्यांनी मला राेहिणीचा पराभव कसा झाला, हे विचारले. त्यावर मी वास्तवाची माहिती दिली,’ एवढेच उत्तर खडसेंनी दिले.
मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांपासून पक्षात अडगळीत पडलेल्या खडसेंचे भाजपात मन रमत नसल्याची चिन्हे आहेत. ‘ओबीसी नेत्यांवर पक्षात अन्याय हाेत असून, आता वेगळा विचार करावा लागेल,’ असे संकेत खडसेंनी यापूर्वीच दिले हाेते.
त्याचाच एक भाग म्हणून खडसेंनी पवारांची भेट घेतल्याचे मानले जाते. मंगळवारी खडसे व उद्धव ठाकरेंची भेट हाेणार आहे. त्यानंतर पवार व ठाकरे यांच्यात चर्चा हाेऊन खडसेंबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.