Ahmednagar Breaking : कर्जत कृषी कार्यालयातील पर्यवेक्षकास माहिती अधिकार कार्यकर्त्याने खंडणी मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात दोन आरोपींपैकी एकास कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा फरार आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश तुळशीराम तोरडमल (रा. बहिरोबावाडी. ता. कर्जत) याने दि. ७ जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत बहिरोबावाडी, सुपे, रेहकुरी, वालवड, चिंचोली काळदात, या गावांमध्ये ठिबक सिंचन योजनेप्रमाणे किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला,
याबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी शासकीय फी २ हजार ८४४ रक्कम घेत त्यास माहिती सुपूर्द करण्यात आली होती. माहिती दिल्यानंतर गणेश तोरडमल याने कृषी पर्यवेक्षकास वारंवार फोन करुन तुमच्या माहितीमध्ये मला बाजार दिसून येतोय,
मी तुमची आता तक्रार करणार आहे. तुम्ही माझ्याशी तडजोड करा अन्यथा तुझ्या अंगावर गाडी घालुन तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती. फिर्यादीने पैसे द्यावेत, यासाठी दादा शिर्के (रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत) हासुध्दा फिर्यादी वारंवार फोन करत होता.
ही बाब फिर्यादीने तालुका कृषी अधीकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या निदर्शनास आणून देत तोरडमल हा १ लाख १५ हजार रुपये मागत असल्याचे सांगितले होते. कृषी अधिकारी म्हस्के यांनी दि. ८ रोजी संध्याकाळी ७ वा. दोन्ही इसमांना कार्यालयात बोलावले असता,
फिर्यादी यांच्याकडून ५० हजार रक्कम खंडणी म्हणून स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत नवनाथ जत्ती यांच्या फिर्यादीवरून गणेश तुळशीराम तोरडमल आणि दादा शिर्के, या दोघांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.