Ahmednagar News : अहमदनगर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे नांगरेंची काळे यांनी समक्ष भेट घेत सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी पुरावा देखील सादर केले. भ्रष्टाचाराची मोठी व्याप्ती लक्षात घेता जलद गतीने याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केल्याची माहिती मुंबईतून दिली.
वरळी येथील कार्यालयात यावर तपशीलवार चर्चा झाल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले, नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत.
अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत.
शहरात रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत. अनेकांना यामुळे अनेक आजार जडले. नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. या सगळ्याचे मूळ हे शहरातील ७७६ रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार यामध्ये दडलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.
मात्र ते होऊन देखील मनपा प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असणाऱ्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचार दडपत त्यांना पाठीशी घालत आहेत. नगर शहरामध्ये चांगले रस्ते नागरिकांना मिळायचे असतील तर अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे अधिकारी, ठेकेदार यांना तपास झाल्यानंतर निश्चितपणे बेड्या पडतील. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल असा विश्वास काळे यांनी नांगरे पाटील यांच्या भेटीनंतर व्यक्त केला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी अँटी करप्शन नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर – घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले आहेत. काळे यांनी देखील याबाबत दूरध्वनीवरून घारगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
बाजार पेठेतील परवाना शुल्क वाढीच्या विरोधासाठीचे दोन दिवसीय धरणे आंदोलन झाल्यानंतर पुढील आठवड्यात काळे घारगे यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन पुरावे सादर करणार आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे देखिल शासनाच्या आस्थापनेच्या नावे बनावट शिक्के, लेटर हेड, दस्तऐवज तयार केल्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.