अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील मौजे कोल्हार बु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
यात, कोल्हार बु. गावातील लक्ष्मीबाई कुंकूलोळ काॅम्प्लेक्समधील जैन स्थानकाचे काॅम्प्लेक्स व माधवराव खर्डेपाटील चौक परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोल्हार-बेलापूर रोड प्रवरा इंग्लिश मिडीयम स्कूलसमोरील हे ठिकाण प्रवेश व बाहेर जाण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.
राहाता तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी २७ जून २०२० रोजीच्या दुपारी २ वाजेपासून दिनांक १० जुलै २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, कोअर एरिया प्रतिबंधित करणे, आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटींग करावा,
अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील वयक्ती घर सोडून येऊ शकणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रात जाणारी व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या/येणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा.
प्रतिबंधित क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून १४ दिवस घरोघरी सर्व्हेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे.
तसेच समन्वय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा घरपोहोच सशुल्क पुरवठा करणे, सामाजिक विलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे, मशिद, मंदिर या ठिकाणी प्रार्थनेसाठी तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकांची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तु यांचे नियोजन संबधित सहायक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे.
प्रतिबंधित क्षेत्रासाठी २४ बाय ७ पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक, लोणी यांनी लावावा असे आदेशित करण्यात आले आहे. उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम १८९७ च्या भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५६ अन्वये दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews