कोपरगाव :- सहकारातील पैशांचा वापर करून समाजात फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांनी वातावरण कलुषित करू नये, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पूर्णाकृती पुतळा १२-१३ वर्षांपासून शिल्पकाराच्या गोदामामध्ये तयार असताना काही नेत्यांनी श्रेयाचे गलिच्छ राजकारण करून पुतळ्याची एक प्रकारे अवहेलना केली.
मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्व समाजबांधवांना एकत्र करून स्वखर्चाने स्मारक समिती स्थापन केली. मुख्याधिकारी सरोदे,अभियंता वाघ यांनी सर्व शासकिय मान्यता मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
मागच्या १५ दिवसांत मी नगर, संगमनेर, मुंबई येथे सात वेळा जाऊन आलो. सर्वांच्या प्रयत्नांतून २९ जुलैला पूर्णाकृती पुतळा बसवण्यास अंतिम मान्यता मिळाली.
१ ऑगस्टला अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या मुहूर्तावर भूमिपूजनाचा मान नगरसेवक अनिल आव्हाड व अग्निशमन दलाचे अधिकारी संभाजी दत्तात्रय कार्ले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना देण्यात आला.
गोदावरी नदीला आलेल्या पुरात पडलेल्या महिलेचे प्राण त्यांना वाचवल्याने हा निर्णय घेतला. तथापि, काही विघ्नसंतोषी प्रवृतींनी या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. अशा गटबाजीच्या राजकारणामुळेच हा पुतळा अनेक वर्षे धुळखात पडला, असे वहाडणे म्हणाले.
“पुतळ्याच्या अनावरण समारंभाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे, असे सांगून सहकारातील पैशांचा वापर करून समाजात फूट पाडून आपला राजकिय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांनी अशा पद्धतीने काहींना पुढे करून वातावरण कलुषित करू नये” – नगराध्यक्ष वहाडणे