आरोग्यसेवेचा लंके पॅटर्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भागा वरखडे :- राज्यात कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. रुग्णसंख्या वाढतं आहे. शहरी भागातही रुग्णांच्या उपचाराच्या पुरेशा सुविधा नाहीत. कोविड सेंटरमधील भोजनाची वेगेवगळी बिलं पाहिली, तर अशा रुग्णसेवेतही कसा गैरव्यवहार होतो, हे वेगवेगळ्या उदाहरणावरून पुढं आलं आहे. काही कोविड सेंटर कशी लुटारू केंद्र झाली आहेत आणि उपचाराच्या खर्चाच्या भीतीनं लोक कोरोनासारख्या आजारानं खचून आत्महत्या करतात.

सार्वजनिक आणि खासगी आरोग्यसेवेला मर्यादा आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची लाखोंच्या घरात गेलेली संख्या पाहता लोकप्रतिनिधी तसंच सहकारी संस्थांनी पुढं यायला हवं. संकटाच्या काळात योगदान द्यायला हवं. त्यामुळं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील लोकप्रतिनिधी, सहकारी साखर कारखान्यांना कोविड सेंटर सुरू करण्याचं आवाहन केलं.

त्यांचं आवाहन लक्षात घेतलं, तर राज्यात अशा संस्थांनी उभ्या केलेल्या कोविड सेंटरची संख्या दोन आकडीही नाही. सहकारी संस्था, वित्तसंस्था ताब्यात असल्या, तरी लोकसेवेची इच्छा शक्ती असावी लागते. पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यातील आमदार नीलेश लंके यांनी मात्र सहकारी संस्था, वित्तसंस्था ताब्यात नसल्या, तरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर राज्याच्या ग्रामीण भागातील एक हजार क्षमतेचं कोविड सेंटर उभं करून त्याला शरद पवार यांचं नाव दिलं.

त्याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना त्याचं उद्‌घाटन करावं वाटलं, यातच सारं आलं. आपल्या नेत्याचा सल्ला इतक्या व्यापक प्रमाणात अंमलात आणणारा दुसरा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात दुसरा कुणी नसावा. कोविड सेंटर उभं करून नीलेश लंके थांबले नाहीत, तर त्याचं व्यवस्थापन करणारी एक यंत्रणा त्यांनी तयार केली. या सेंटरमध्ये खासगी आणि सरकारी मिळून ५४ डाॅक्टर काम करतात.

इतर ठिकाणी खाटा उपलब्ध नाहीत, म्हणून रुग्ण इकडून तिकडं फिरत असताना कर्जुलेहर्या येथील कोविड सेंटरमध्ये मात्र केवळ पारनेर तालुक्यातील रुग्ण येत नाहीत, तर पारनेर तालुक्यातील जी मंडळी पुणे किंवा मुंबईत नोकरीनिमित्त आहेत, त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, की ती कर्जुलेहर्या गाठतात. इतका विश्वास या कोविड सेंटरनं निर्माण केला आहे. त्याचं कारण या सेंटरमध्ये मिळणारे उपचार आणि तेथील अन्य सेवा हेच आहे.

कर्जुलेहर्या येथील शरद पवार कोविड सेंटरची क्षमता एक हजार खाटांची आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे सर्वांत मोठं कोविड सेंटर आहे. या केंद्राची किर्ती ऐकून नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रांचं व्यवस्थापन नीलेश लंके प्रतिष्ठान पाहत आहे. त्याची जबाबदारी बाळासाहेब खिलारी यांच्याकडं आहे. कार्यकर्त्यांचं एक पथक येथील रुग्णसेवा आणि खानपान व्यवस्थेवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे.

कोरोनाबाधितांना आपण घराच्या बाहेर आहोत आणि आपल्याला मोठ्या आजारानं ग्रासलं आहे, असं वाटतच नाही, इतकं इथलं वातावरण प्रसन्न आहे. तिथं योगासनाचे धडे दिले जातात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इथलं आरोग्यदायी भोजन आणि नाष्टा. पोहे, उपमा, अंडी, काळे मणुके, बदाम, काळे खजूर, दूध, काजू असा पाैष्टिक आहार इथं दिला जातो. शाकाहारी आणि मासांहारी अशा दोन्ही पद्धतीच्या भोजनाची सुविधा इथं आहे.

ग्रामीण भागात जे अन्न घरोघरी केलं जातं, तेच अन्न इथल्या कोविड सेंटरमध्ये दिलं जातं. कोविडसेंटरमध्ये एक पैसाही घेतला जात नाही. आरोग्यसेवेला इथं महत्त्व दिलं जातं. रुग्णांत इथं देव पाहिला जातो. नीलेश लंके प्रतिष्ठाननं कोविडसेंटरच्या माध्यमातून उभं केलेलं काम हा आरोग्यसेवेचा लंके पॅटर्न राज्यात चर्चिला गेला नसता, तरच नवल.

लेखक जेष्ठ संपादक असून पत्रकारितेत ३५ वर्षांचा अनुभव आहे. मोबाईल नंबर : 9822550012

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24