नगर : नगरमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी, चेन स्नॅचिंग व मारहाणीचे प्रकार होत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला.
नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन केली आहे.
दरम्यान, ५ मार्चला अशी आढावा बैठक प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत घेण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे परंतु या बैठकीची तारीख आजूनही निश्चित झाली नाही.
आमदार जगताप यांनी मंत्री देशमुख यांना दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवले आहे. नगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसा चोऱ्या व घरफोड्यांचे प्रकार होत आहेत. चेन स्नॅचिंगच्याही घटना होत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे; तसेच वैयक्तिक द्वेषापोटी अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
त्यामुळे मंत्री देशमुख व पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नगर शहरातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.