अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काल मंगळवार पर्यत 396 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात सुरूवातीच्या लॅाकडाऊनमध्ये गावगावात काळजी घेणारे पुढारी ग्रामपंचायत निवडणूक लागताच कोरोनाला विसरले असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
त्याकाळात काळजी घेणारेच आता उमेदवारी अर्ज भरताना तहसिल कार्यालयात, सेतु कार्यालय परिसरात मोठी गर्दी करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीने काळजी घेणार्याना निष्काळजी बनविले व करोनाचे तिन तेरा वाजवल्याचे चित्र आहे.
तहसील कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांची एकच गर्दी झाली होती. आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.