Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील चिचोली येथे रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. परंतु या शेतकऱ्याच्या प्रसंगावधनाने त्याचे प्राण वाचले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील मच्छिद्र तुकाराम पठारे यांची गंगापूर, चिंचोली शिवरस्त्याच्या कडेला गट नंबर ६२ मध्ये शेती असून ही शेती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मच्छिद्र पठारे हे रविवारी (दि.२८) रात्रीची लाईट असल्याने शेतात पिकास पाणी देण्यासाठी एकटेच गेले होते.
पाणी चालू करून वाफा भरून होइपर्यंत ते एका जागी बसले असता त्यांच्या मागे आवाज आला म्हणून त्यांनी बॅटरीचा उजेड त्याबाजूने केला असता त्यांना बिबट्या त्यांच्या अंगावर झेप घेण्याच्या तयारीत असलेला दिसला. त्यांनी बॅटरी त्याच्या अंगावर लावून धरली, तरीही बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली.
परंतु त्यांच्याजवळ काठी असल्याने त्यांनी थोडा प्रतिकार करत शेजारीच रहात असलेला त्यांचा पुतण्या प्रसाद गोरक्षनाथ पठारे यास जोरात आवाज देण्यास सुरुवात केल्याने त्या आवाजाने प्रसाद धावत आल्याने बिबट्या तेथून पळाला.
तरीही मच्छिद्र पठारे या शेतकऱ्यास या बिबट्याने तोंडावर, खांद्याला तसेच डोक्यावर जखमा केल्या आहेत. त्यांनी गुहा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आहेत. यावेळी पांडू लाटे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
रात्रीच्या लाईटमुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत असून महावितरणने दिवसा लाईट दिल्यास शेतकऱ्यांना जीवाशी खेळावे लागणार नसल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत.