Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील देहरे येथे जवळपास पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सोमवार (दि.25) रोजी बाराच्या सुमारास सुटका केली.
विहिरीत बिबट्या पडल्याचे शेतमालक नामदेव पठारे यांच्या लक्षात येताच तसेच ग्रामस्थ महेश काळे यांनी वनविभागास व जिल्हा मानद वन्य जीव संरक्षक तथा जिल्हा व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाचे प्रभारी सहायक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, तसेच रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्यास सुखरूप बाहेर काढले.
तेथील ग्रामस्थ सोमनाथ काळे यांनी विहिरीत कुठेही कठडा नसल्याने जाड दोरखंड विहिरीत सोडल्याने बिबट्यास आधार मिळाला. तसेच पठारे यांनीही त्यास पाण्यात शॉक बसू नये म्हणून वीजपंपाचा विद्युत पुरवठा तातडीने खंडित केला.
हा साधारण दोन वर्षे वयाचा बिबट्या होता. त्यास बाहेर येता यावे यासाठी विहिरीत दोरखंड व दोरीची शिडी सोडण्यात आली होती. त्याच्या मदतीने वर येत बिबट्याने पुन्हा निसर्गात धूम ठोकली.
वनविभागाच्या वनरक्षक राजश्री राऊत, मनेष जाधव, विजय चेमटे, अमोल गोसावी, बाळू दाणी, दीनकर शिंदे, संदीप ठोंबरे, बाबासाहेब बडेकर, संजय सरोदे, नवनाथ मते यांनी परिश्रम घेतले.
या भागात बिबट्यांचा वावर असून ते सायंकाळ नंतर शिकारीस बाहेर पडतात त्यामुळे या वेळात शेतात एकटे जाणे टाळावे व लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना राठोड व साबळे यांनी ग्रामस्थांना दिल्या.
ससेवाडीत बिबट्याने शेळीचा पाडला फडशा
जेऊरमधील ससेवाडी येथे बिबट्याचे दर्शन नेहमीच होत आहे. या भागात बिबट्याने ससेवाडीत एका शेळीचा फडशा पाडला असून वनविभागाला माहिती समजताच त्याठिकाणी जाऊन मृत शेळीचा पंचनामा देखील केले असल्याची माहिती समजली आहे. त्याठिकाणची एकंदरीत परिस्थिती पाहून पिंजरा लावला जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून समजलीये.