नगर तालुक्यातील ‘या’ परिसरात बिबट्याचे वास्तव्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्यानेा कुत्र्याची शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

वनविभागाच्या वतीने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी मनेष जाधव यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

जेऊर मधील चापेवाडी शिवारात दादासाहेब काळे यांच्या गट नंबर ९१४ मध्ये राहत असलेल्या घरातील पढवीतून कुर्त्याची शिकार करण्यात आली आहे. ही घटना सोमवार दि.२१ रोजी घडली.

राळरास परिसरात दादासाहेब काळे यांची वस्ती असुन वस्तीलगत वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. या परिसरात हरीण, काळवीट व इतर वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे.

काळे यांची मागिल आठवड्यात शेळी फस्त करण्यात आली होती परंतु त्यावेळी लांडग्यांच्या हल्ल्यात शेळी मरण पावल्याचे समजण्यात आले होते. परंतु आजच्या घटनेवरून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागिल महिन्यात ससेवाडी येथे बिबट्याने काळविटाची शिकार केली होती. यापूर्वी देखील जेऊर परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आलेले आहे.

इमामपुर घाटात कड्यावरुन पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. तसेच इमामपूर येथील दोन शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

बहिरवाडी येथील वाकी वस्तीवर बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आला होता. या घटनांवरून जेऊर परिसरातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24