अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी काळकूप परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आला. स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर सायंकाळी नगरच्या लष्करी तुकडीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय बांडे व त्यांच्या पत्नी वर्षा बांडे हे डोंगरावरून परतत असताना जमिनीमध्ये अर्धवट रुतलेला हा बॉम्ब वर्षा बांडे यांच्या निदर्शनास आला.
तो वाटण वाटण्यासाठी आलेल्या पाट्यावरचा वरवंटा असावा, असे वाटून त्यांनी तो उचलला. त्याच वेळी तेथून अभिजित रोहोकले व अरुण रोहोकले हे दोघे तरूणही फिरून परतत होते.
वर्षा यांच्या हातातील असलेली लोखंडी वस्तू बॉम्ब असावा, असा संशय अभिजित रोहोकले यांनी व्यक्त केला. लष्करी साधनसामग्रीच्या अभ्यासाची आवड असलेल्या
अभिजित यांचे नाशिक येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बंधू सुनील रोहोकले यांना त्या वस्तूचे फोटो पाठविले. तो लष्करी बॉम्ब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डोंगराच्या पायथ्याशी बॉम्ब असल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजित रोहोकले यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना त्यासंदर्भात माहिती दिली.
झावरे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तसे कळविल्यानंतर त्यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले.
सहा.पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पो. कॉ. भालचंद्र दिवटे, मंडलाधिकारी कदम, तलाठी शशी मोरे यांच्यासह देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयास्पद बॉम्ब रस्त्यापासून दुर नेण्यात येउन त्याभोवती दगडाचे संरक्षक कडे तयार करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com