अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉ. कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी नगरला भेट दिली.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, तसेच श्रमिकनगरची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,
मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलिसप्रमुख अखिलेशकुमार सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. साळुंके,
मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे उपस्थित होते. त्यानंतर पथकाने नियोजन समिती सभागृहात कोरोनाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी माहिती दिली. डॉ. कुशवाह म्हणाले, लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत नगरची परिस्थिती नियंत्रणात आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन हा पर्याय असणार नाही. मात्र, अनलॉक करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये अधिक जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मास्क वापरला, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखता येतो.
ग्रामीण भागात लोकसंख्या काही भागात विखुरल्यामुळे संसर्गाचा प्रादुर्भावाची शक्यता कमी असली, तरी तेथे वेळेवर सर्वेक्षण आणि रुग्णांना वेळेत उपचार या बाबी महत्त्वाच्या आहेत, असे डॉ. कुशवाह म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com