अहमदनगर :- महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू कमल सावंत या अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आपले भाग्य आजमावणार आहेत.
ही माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सावंत म्हणाल्या की, घराणेशाहीच्या विरोधात मी लोकसभा अपक्ष लढविणार आहे.
सध्याच्या राजकारण्यांना शेतक-यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतक-यांना वापरुन घेण्याचे काम राजकारण्यांकडून सातत्याने होत आहे.
अनेक शेतकरी कर्जबाजारी असून, आत्महत्या करीत आहेत. महिलांचे प्रश्नही सुटलेले नाहीत. महिलांचे मतदान पाहिजे.
परंतु, त्यांच्या समस्या सोडविण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. त्यांना उमेदवारीही कोणी देत नाही. त्यासाठी मी निवडणूक लढण्यासाठी पुढे आले आहेत.
उमेदवारीसाठी कोणीही उठतो, कोणत्याही पक्षात प्रवेश करतो आणि त्याला तिकिटही दिले जाते. हे म्हणजे आयपीएलच्या सामन्यांसारखे झाले आहे. जो चांगला प्लेअर त्याला विकत घ्यायचे आणि मॅच जिंकायची.
आपले राजकारणही त्या आयपीएलच्या मॅचसारखे झाले आहे, अशा शब्दात सावंत यांनी राजकारणातील पक्ष बदलणाºया नेत्यांवर टीका केली.
कोण आहेत सावंत ?
सावंत या महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती आहेत.
सावंत या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील असून, त्या १९९२ ते १९९७ या कालावधीत येळपणे गटात जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या.
जिल्हा परिषदेत त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे. सावंत या उत्कृष्ट क्रिकेटपटू होत्या.
महाराष्ट्र महिला संघाकडून त्या १९७५ ते १९८६ या कालावधीत खेळत होत्या. पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्त्वही त्यांनी केले होते.
जिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर सावंत यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सहसचिव व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम केलेले आहे.