अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र समाजात हा प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप` असा प्रकार घडतो आहे.
अनेक ठिकाणी लग्नानंतर हुंड्यासाठी मुलींचे छळ होत आहेत. लोणी खुर्द येथील मापारी कुटुंबात लग्नाच्या दिवसापासून हुंड्यासाठी छळ होत असल्याची घटना समोर आली आहे.
पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील लोणी खुर्द (मापारवाडी) येथील मापारी कुटुंबाच्या सहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सौ. शितल प्रशांत मापारी (रा. मापारवाडी,लोणी खुर्द) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, माझे माहेर कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील असून प्रशांत तान्हाजी मापारी याच्या सोबत 27 मे 2017 रोजी विवाह झाला. विवाहासाठी माझ्या वडिलांनी 7 लाख रुपये खर्च केला.
पण विवाहाच्या वेळीच सासरच्या लोकांनी 5 लाख रुपये हुंड्याची मागणी केली.ती माझे वडील पूर्ण करू शकत नव्हते. मी सासरी आल्यानंतर सासरे, सासू, पती, दीर, जाऊ, भाया यांनी मला सतत हुंड्याची मागणी करीत शारीरिक,मानसिक त्रास दिला. अनेकदा मारहाण केली. धोंड्याच्या महिन्यात एक तोळा सोन्याच्या अंगठीची मागणी केली. मी गरोदर राहिले.
मला माहेरी पाठवून दिल्यावर पुन्हा कुणी भेटायला सुद्धा आले नाही. मी मुलीला जन्म दिला म्हणून मुलासाठी माझा छळ सुरु केला. माझ्या वडिलांनी फेब्रुवारी 2019 मध्ये सासरच्या लोकांना एक लाख रुपये दिले तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी राहिलेल्या चार लाखांची मागणी चालूच ठेवली.
माझ्या सासूने मला एक तोळे सोन्याची पोथ माहेरकडून करून आणायला सांगितली. माझ्या वडिलांनी तीही करून दिली. तरीही माझा त्रास कमी झाला नाही.मी दुसर्यांदा गरोदर राहिले. हुंड्याच्या पैशांसाठी मला पाच महिने आधीच माहेरी पाठवून दिले. मला कुणीही भेटायला आले नाही. मी मुलाला जन्म दिला.
मला कुणी न्यायला सुद्धा आले नाही. मला हुंड्यासाठी छळ करणार्या तान्हाजी नामदेव मापारी (सासरे), सरिता तान्हाजी मापारी (सासू), प्रशांत तान्हाजी मापारी (पती), श्रीकांत तान्हाजी मापारी(भाया),
रुपाली श्रीकांत मापारी (जाऊ) आणि प्रवीण तान्हाजी मापारी (दीर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
लोणी पोलिसांनी भादवी कलम 498 (अ), 406, 323, 504, 506, 34, हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला.पुढील तपास सपोनि प्रकाश पाटील करीत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved