अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या.
यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाची कोणतीही ‘मीडिया ट्रायल’ करू नये. या घटनेमध्ये आपण थिल्लरपणा सहन करणार नाही.
प्रसारमाध्यमांनी संयमाने वागावे . तसेच, सुनावणीदरम्यान किंवा पोलीस तपासात माध्यमांकडून वार्तांकन करताना संयम सुटल्याचे निदर्शनास आल्यास थेट कारवाई करू,
असा इशारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिला आहे . या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होती.
पोलिसांकडून कागदपत्रे उशिरा आल्याने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सोबत पोलिसांनी बोठे याला स्वत: हजर करण्यात यावे, अशा विनंतीचा अर्जही केला आहे.
हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त होताना जपून लिहावे.
मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही कोर्टाने बजावले.
आरोपीचे वकील अॅड. महेश तवले यांनी काही कथित समाजसेवक या प्रकरणाबद्दल आणि कोर्टाबद्लही सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करीत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर कोर्टाने कुठे काही आक्षेपार्ह आढळून आले तर, त्याच्या प्रिंट काढून कोर्टात सादर करा, अशा सूचना तवले यांना दिल्या.