कोटा : राजस्थानमध्ये बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्यासोबत लग्न करणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
हा नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववीच्या वर्गात शिकणारी ही १५ वर्षीय मुलगी बुधवारी शाळेतून परत येत होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या काही व्यक्तींनी तिचे अपहरण केले.
या लोकांमध्ये पीडितेसोबत बालविवाह करणाऱ्या २० वर्षीय युवकाचा समावेश होता. त्याचे आणि पीडितेचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्न होऊन काही वर्षे झाली तरी मुलीला नांदायला पाठवत नसल्यामुळे तो नाराज होता.
यातूनच त्याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. गुरुवारी या मुलीची सुटका करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी तो युवक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे तर मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे.
परंतु अद्यापही देशातील ग्रामीण भागात आणि त्यातही यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा यांसारख्या राज्यात बालविवाह होतात.