अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीकरण’ (एनपीआर) हे ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’चे पहिले पाऊल असून या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशाची दिशाभूल करीत आहेत, अशी तिखट टीका एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केली आहे.
‘नागरिकत्व अधिनियम-१९५५’च्या प्रमाणे ‘एनपीआर’ देशभरात लागू करण्यात येत आहे. परंतु हे ‘एनआरसी’शी संबंधित नाही काय? असा सवाल उपस्थित करीत अमित शहा देशाची दिशाभूल करीत आहेत, असा कडवट प्रहार ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
संसदेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी माझा नामोल्लेख करून एनआरसी देशभरात लागू करण्याची घोषणा केली. परंतु ते आता खोटे बोलत आहेत. त्यांनी पूर्वीच्या भूमिकेवरून सपशेल यूटर्न घेतला आहे.
जोपर्यंत सूर्य पूर्वेकडून उगवत राहील, तोपर्यंत आम्ही सत्याची कास धरणार आहोत, असे ओवेसी यांनी ठणकाविले. एप्रिल २०२० मध्ये एनपीआर केले जाणार आहे.
तेव्हा अधिकारी नागरिकांना दस्तावेज मागतील. त्यानंतर अंतिम सूची एनआरसी तयार होईल, असा दावा त्यांनी केला आहे.