अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर शहर सात दिवस लॉकडाऊन करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय झाला, मात्र त्यानंतर मतमतांतरे सुरू झाली.
सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण करण्यात ताकद वाया घालवण्यापेक्षा जनतेला उपचार सुविधा, रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी ताकद लावणे गरजेचे आहे, असे सर्वसामान्यांना वाटते.
श्रीरामपूर शहर १३ ते २० सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. मात्र, या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे.
लॉकडाऊनबाबत जनता काय निर्णय घ्यायचा तो घेईल, मात्र आरोग्य सेवेचे काय? एखादी व्यक्ती आजारी पडली, तर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, रुग्णालयात बेड मिळत नाही अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या.
आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण आरोग्य रुग्णालयात ५० आयसीयू बेडचे कोरोना उपचार केंद्र आठ दिवसांत सुरू होत आहे. सध्या संत लूक रुग्णालयात कोरोना उपचार केंद्र सुरू आहे.
मात्र, त्यांना शासनाकडून निधी मिळाला नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न जटिल बनला आहे. डॉ. आंबेडकर वसतिगृहात सुरू असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्येही अत्याधुनिक सुविधांची गरज आहे.
रुग्णवाहिका, व्हेंटलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवणे, उपचार केंद्राची संख्या वाढवणे आदी गोष्टींसाठी निधी उभारणे गरजेचे आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved