कोपरगाव : आत्मा मालिक ध्यानपिठ हे अध्यात्मिक उर्जा केंद्र आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच याची प्रचिती येते, असे गौरवोद्गार अकोला विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी काढले.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळेतील मुलांच्या विभागीय क्रिडा स्पर्धा व विज्ञान, गणित, कलादालन प्रदर्शनाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर प.पु. गुरूमाऊली, संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, नाशिक आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीष सरोदे, उपायुक्त प्रदिप पोळ, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, राहाता नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी आसिमा मित्तल,
आदिवासी सेवक बाबा खरात आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, विठ्ठलराव होन, बाळासाहेब गोरडे, जाधव भाई पावसीया आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.डॉ.लहामटे पुढे म्हणाले की, जंगली महाराज आश्रमाबद्दल मी ऐकुण होतो.
परंतु आश्रमात प्रवेश केल्यानंतर येथील भव्यतेची जाणीव झाली. हे एक प्रशस्त विद्या मंदिर आहे. या विद्यामंदिरात आमच्या दुर्गम भागातील विद्यार्थी मोठीमोठी स्वप्ने पाहणार आहेत. नाचणे, गाणे ही आमची संस्कृ ती आहे. जगाव कसं याचा आदर्श म्हणजे आदिवासी हे आहे.
आमच्यात बुजरेपणा आहे. म्हणुन आम्हाला दुरावा देवु नका. आम्हाला वनवासी म्हणु नका. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाप्रमाणेच आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची सुचना यावेळी लहामटे यांनी आदिवासी विभागाच्या आधिकारी व शिक्षकांना केली.
माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, आश्रमशाळा विभागीय क्रिडा स्पर्धा म्हणजे आदिवासीची विकासाकडे होणारी वाटचाल आहे. मी लहानपासुन आदिवासींचे जीवन पाहीले आहे.
त्यामुळे आदिवासीच्या समस्यांची मला जाणीव आहे. संत परमानंद महाराज म्हणाले की, आदिवासी समाज हा एक योध्दा आहे. संघर्ष त्यांच्या रक्तात आहे, हे कायम लक्षात ठेवावे.