कोपरगाव : शहरात सध्या डेंग्यूसदृश्य आजार व अन्य साथींचे आजाराचे रूग्ण वाढत आहे. कोपरगाव ग्रामिण रूग्णालय व संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रूग्णांना खासगी दवाखान्यांत दाखल होवून उपचार घेणे असह्य होत आहे. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट कोपरगाव ग्रामिण रूग्णालयास मंगळवारी अचानकपणे भेट देवून सर्व परिस्थिती जाणून घेतली.
त्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येथील रूग्णांना भेटून त्यांनी धीर दिला आहे.. उपनगराध्यक्ष योगेश बागूल व सर्व नगरसेवकांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांना शहर स्वच्छतेची व त्यावरील उपाययोजनांची माहिती देत साथीचे आजार रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले.
आमदार कोल्हे यांनी या सर्व परिस्थितीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कल्पना दिली. ग्रामिण रूग्णालयात औषधांचा तुटवडा आहे, रक्त तपासण्याचे अहवालही व्यवस्थीत दिले जात नाही, प्रभागातील केरकचरा उचलला जात नाही, घंटागाड्या अनेक ठिकाणी येतच नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा तक्रारी रूग्णांनी यावेळी केल्या. आ. कोल्हे म्हणाल्या, शहरात ४ ते ५ ऑगस्ट रोजी महापूर सदृश्य परिस्थिती होती. महापूर ओसरल्यानंतर साथींच्या आजाराने डोके वर काढले आहे. नागरिकांना याबाबतच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहे.
भारतीय जनता पार्टी, संजीवनी उद्योग समुहाच्या सहकार्याने सर्व प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत पुरेशी काळजी घेवून त्यावरील उपाययोजना करायला पाहिजे. मात्र, त्या पुरेशा प्रमाणात नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील अनेक प्रभागातील गोरगरीब रूग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेवू शकत नाही, ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल होताच त्यांना खासगी रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो, शासनामार्फत आवश्यक ती सर्व यंत्रणा असतांना असे का घडते याबाबतही आ. कोल्हे यांनी आश्चर्य व्यक्त करत, संबंधीत वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. साथीचे आजार उच्चाटनासाठी सर्वांनी सहकार्य द्यावे, ज्या प्रभागात जास्त अस्वच्छता असेल तेथे स्वच्छता केली जावी, महापूर परिस्थितीनंतर आपण प्रशासकीय यंत्रणा व नगरपालिकेसही याबाबत दक्षता घ्या म्हणून सूचना केल्या होत्या.
तेव्हा ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सर्व वैद्यकिय यंत्रणेने, तालुकारोग्य अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने त्याबाबत काळजी घ्यावी; अन्यथा जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल, असेही त्या शेवटी म्हणाल्या.