अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-‘हंगा तिथे दंगा’ अशी हेटाळणी करून तालुक्यातील अधिकारी तसेच राजकिय पुढाऱ्यांकडूनही हंग्याच्या नागरीकांना वेगळी वागणूक दिली जायची. सन २०१० मध्ये गावातील ५० टक्के तंटे एकत्र बसून मिटविले काही न्यायालयात मिटविले.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व ग्रामस्थांनीच एकत्र बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रमस्थांचे आहे, माझे नाही.
सर्वांनी राग लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे गाव नव्हे तर परिवार म्हणून ओळखले जाईल असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा व गावाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी घ्या या मतदार संघातील गावांना आ. नीलेश लंके यांनी केलेल्या आवाहानास चांगला प्रतिसाद लाभला.
लंके यांचे गाव असलेल्या हंगे गावात मात्र त्यांच्या काही पारंपारीक विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने हंग्याची निवडणूक बिनविरोध होणार का ? याची संपूर्ण जिल्हयास उत्सुकता होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना अर्ज दाखल केलेल्या विरोधकांनी आ. लंके यांच्याशी चर्चा करून बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी दर्शविली.
विशेष म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बिनविरोध निवडीमध्ये एकही जागा न घेता विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखविला.
मतदार संघात निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आहोरात्र परिश्रम करणा-या आ. लंके यांना खाली पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.