अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे व नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनदरबारी पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी दिली.
आमदार पाचपुते यांनी नगर तालुक्यातील आठवड, चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, भातोडी, पारेवाडी, पिंपळगाव लाडगा या गावांचा पाहणी दौरा केला.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, बाजरी, कांदा व इतर भुसार पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून आले. आमदार पाचपुते यांनी शेतकऱ्यांशी त्यांच्या शेतात जाऊन चर्चा केली.
शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. पाचपुते यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले, मी तुमच्यामागे खंबीर उभा आहे, काळजी करु नका.
ज्यांना काहीच करायचे नाही, ते चर्चा करतात की, पाचपुते यांचा संपर्क कमी झाला, ते आजारी आहेत. तो त्यांचा गैरसमज आहे. सध्या आपण कोरोना नियमांचे पालन करत असलो,
तरी फोनद्वारे सतत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या, तसेच कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. माझी व माझ्या तब्येतीची कोणी काळजी करण्याचे कारण नाही. पिकांच्या नुकसानीसंदर्भात आपली कृषिमंत्री भुसे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशीही चर्चा झाली आहे. लवकरात लवकर पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी मी केली आहे.
जर सरकारने गंभीर दखल घेतली नाही, तर आपण वेळप्रसंगी शेतकरी हितासाठी आंदोलन करू. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आमदार पाचपुते म्हणाले
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved