अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- यंदा कोरोना संकटामुळे अनेक उत्सव, जत्रांचे आयोजन रद्द करावे लागले. सण साधेपणाने साजरे करावे लागले. या सगळ्याची सुरुवात गुढी पाडव्यापासूनच झाली.
आता नवरात्रौत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. नुकतीच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा देवस्थानचा यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शासनाकडून सुधारित आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती न्या. अशोक भिलारे व प्रांताधिकारी तथा यात्रा नियंत्रक प्रमुख देवदत्त केकाण यांनी दिली.
येत्या 17 तारखेपासून मोहटा देवस्थानमध्ये नवरात्रीला प्रारंभ होत आहे. घटस्थापना सप्तशती पाठ, होमहवन, नित्य महापूजा असे सर्व विधी जमावबंदीचा आदेश पाळून होणार आहेत.
दरम्यान कोरोनाचे संकट पाहता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुरोहिताशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कावडी यात्राही प्रतिकात्मक होऊन मुखवटा मिरवणूक देवस्थानच्या वाहनातूनच निघेल. त्यानंतर घटस्थापना होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पूर्ण नियंत्रण देवस्थान समितीवर असेल. गडाभोवती विशिष्ट अंतरावर भाविकांना रोखून त्यांना माघारी पाठविण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांना अहोरात्र पार पाडावी लागेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved