अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके जोमात असल्याने बळीराजा सुखावला आहे.
मात्र, ऑगस्टमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिमझिम पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला मुगाचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनामुळे मूग तोडणीला मजूर मिळत नाहीत. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सततच्या पावसामुळे तोडणीत अडचणी येत असून अनेक ठिकाणी मुगाला कोंब फुटले आहेत.
गेल्या सात-आठ वर्षांपासून नगर जिल्ह्यात मुगाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कमी पावसात मुगाचे पीक चांगले येते. यंदा मात्र पावसाने सुरुवातीलपासून समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली.
वेळोवेळी होत असलेल्या पावसामुळे मुगाचे पिकही चांगलेच तरारले आहे. सध्या मुगाची तोडणी सुरु आहे. असे असले तरी गेल्या पाच-सहा दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात रिपरिप सुरु आहे.
त्यामुळे मूग तोडण्यास विलंब होत असून तोडणीला आलेल्या मुगाला पावसामुळे कोंब फुटले आहेत. शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावण्याशी शक्यता आहे.
कोरोनामुळे मजूर गावी गेल्यामुळे शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे सावडीने किंवा घरच्याघरीच करावी लागत आहेत.
एकीकडे मजूर नाहीत अन दुसरीकडे सततची रिपरिप, यामुळे बागाईतदार शेतकर्यांसमोर मुग तोडायचा कसा, असा प्रश्न आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved