अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गाव पातळीवरील ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घालू नका, तुम्ही असे करणार असाल तर मलाही तुमच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल असे सांगत रांजणगांवमशिद येथील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या पार्श्वभुमिवर खासदार सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना खडे बोल सुनावले !
दरम्यान,रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घरवापसी केली असून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आ. लंके यांच्या भेटीसाठी गेलो होतो, प्रवेशासाठी नाही असा खुलासाही बाबासाहेब जवक यांनी केला आहे.
सेवा संस्थेचे संचालक जवक यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी रविवारी पारनेर येथे आमदार नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयास भेट देउन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.राहुल शिंदे यांच्या जवळच्याच कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
दुध संघाच्या अध्यक्षपदावरून दुर केल्यानंतर गाव पातळीवरही आ. लंके यांनी शिंदे यांना धक्का दिल्याने आगामी ग्रामपंचायत, सेवा संस्थेची निवडणूक अटीतटीची होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. प्रमुख कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानंतर पॅच अप करण्यात राहुल पाटील यांना यश आले आहे.
शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची पुण्यात खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमवेत बैठक घडवून आणीत सर्वांनी राहुल पाटलांसोबत काम करण्याचा निर्णय जाहिर केला. बैठकीनंतर आम्ही केवळ लोेकप्रतिनिधी म्हणून आ. लंके यांच्या भेटीला गेलो होतो. व्यायाम शाळेच्या साहित्याबाबत चर्चा केली होती.
तेथून परतल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर आम्ही राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधून आमची भुमिका स्पष्ट केल्याचे बाबासाहेब जवक यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved