नेवासा : तालुक्यातील श्री.क्षेत्र देवगडचे दत्त मंदिर,संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय,उपहारगृहे, इतर दूकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती देवगड संस्थानच्या वतिने देण्यात आली आहे.
श्री.क्षेत्र देवगड येथे किसनगिरीबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि.१६ मार्च ते दि.२१ मार्च या कालावधी मध्ये सप्ताहाचे अत्यंत अत्यल्प प्रमाणात नियोजन केलेले होते.
परंतु जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच महाराष्ट्रातील विषाणूबाधीतांची संख्या लक्षात घेता तसेच जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेऊन सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थान प्रशासनाने नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम पुर्णतः रद्द केलेला आहे.
तसेच संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय,उपहारगृहे, इतर दूकाने तथा मंदिर प्रवेश पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवलेली आहेत. तरी श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनार्थ येणाऱ्या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र देवगड येथील गर्दी नियंत्रणासाठी संस्थान प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.