अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीतील विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली होती.
या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळची रत्नापूरची रहिवासी असलेली मुक्ता संभाजी वारे १८ च्या सायंकाळपासून बेपत्ता होती.
नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. ती न सापडल्याने मुलीचे आजोबा शहाजी कोंडीबा यादव यांनी १९ रोजी जामखेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मुक्ताचा मृतदेह डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथील विहिरीत तरंगताना आढळला.
ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले.
मुलीचे वडील संभाजी रामभाऊ वारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. या प्रकरणामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तपासाचे जामखेड पोलिसांसमोर आव्हान आहे.
हत्या की आत्महत्या?
मुक्ता अरणगाव येथे बारावीत शिकत होती. तिचे मूळ गाव रत्नापूर असून ती आपल्या डोणगाव येथील मामाच्या गावी आजी-आजोबांकडे लहानपणापासून रहात होती. ती अतिशय शांत स्वभावाची होती.
तिचा मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तिची हत्या का आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews