अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा केल्याने पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात बजाज फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी, एजंंट व व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गंगा संतोष पालकर (रा. गोंधवणी) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज फायनन्स कंपनीचा वसुली अधिकारी तनविर सिकंदर तांबोळी,
एजंट विनायक मुसमाडे (दोघे रा. श्रीरामपूर) व बजाज फायनान्स ऑफिसचे व्यवस्थापक (नाव माहीत नाही) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंधवणी येथील संतोष घनश्याम पालकर (वय ४०) यांनी २९ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाकडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर त्यांची पत्नी गंगा पालकर यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा लावल्यामुळे पतीने आत्महत्या केल्याची तक्रार केली.
संतोष यांनी २०१८ मध्ये बजाज फायनान्स कंपनीकडून जनरल स्टोअर्स दुकान सुरू करण्यासाठी १ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मार्च २०२० मध्ये करोनाचा कहर सुरू झाल्याने लॉकडाऊनमध्ये कर्जाचे हप्ते थकले होते.
पंधरा दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी तांबोळी, एजंट व व्यवस्थापक यांनी घरी येवून पतीकडे थकीत हप्त्याची मागणी केली. तसेच वेळेवर हप्ते भरले नाही तर चक्रीवाढ व्याज लावू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे पती संतोष यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. असे फिर्यादीत नमुद केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews