— माझ्या नवर्‍यानेच माझ्या मुलाचा घात केला आहे. काळजाचा तुकडा हिरावला …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :  अपघातात जखमी झाल्याचा दावा केला जात असलेल्या तरुणाचा मृत्यू हा त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

शेतजमिनीच्या वाटपावरून वाद झाल्याने करण्यात आलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार त्याच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी मयत तरुणाची मृताची पत्नी रोहिणी रामदास खरात [वय २८, धंदा-शेती /मजुरी, रा. पाचुंदा ता. नेवासा] हिने फिर्याद दिली. यात म्हटले, तिचे पती रामदास (वय ३२), एक मुलगा आणि एक मुलगी असे एकत्र राहावयास होते.

तिचे सासू-सासरे हे निंबेनांदूरकडे जाणार्‍या रोडलगतच्या मळ्यात राहावयास असून त्यांच्यासोबत नणंद मीनाबाई शशिकांत एडके ही राहत आहे. पती रामदास यांना एक मोठा भाऊ असून त्याचे नाव रोहिदास आहे.

सध्या जम्मू-काश्मीर येथे लष्करामध्ये असून तो सुट्टीवर आलेला आहे. तो अहमदनगर येथे राहण्यास असून अधूनमधून गावी पाचुंदा येथे येत असतो.

या कुटुंबाची सामाईक शेती असून सासरे शेती करतात आणि त्यातून येणारे उत्पन्नही भाया रोहिदास याला जास्त देतात. पती रामदास हे सासरे लक्ष्मण यांना मला शेती कमी असून आम्हा दोघा भावांना समान शेती द्या, असे म्हणत.

त्यावरुन त्या दोघांमध्ये वाद होत असत. सासरे हेपतीला नेहमी जीवे ठार मारण्याची धमकी देत असत. दि. ६ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पती आणि दोन मुले घरी असताना पती म्हणाले,

की काही वेळापूर्वी त्यांचे आणि वडिलांचे शेती वाटपाच्या कारणावरुन वाद झाले आहेत. त्यांनी परत बोलावले आहे. ते म्हणाले, की आपण बसून शेतीचा वाद मिटवून घेऊ.

जेवण झाल्यावर पती रामदास हे सासरे लक्ष्मण यांच्या मळ्यात गेले. मात्र बराच वेळ ते घरी आले नाहीत. बराच वेळ वाट पाहून झोपी आम्ही गेलो.

सकाळ झाली तरी न आल्यामुळे दि. ७ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पती रामदास यांच्या मोबाईल फोनवर फोन केला.

मात्र तो फोन माझे सासरे लक्ष्मण यांनी उचलला आणि सांगितले, की रामदास याचा रात्री अपघात झाला आहे. त्याला अपघातामध्ये मार लागला असून उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

पती यांच्या मोबाईलवर सासरे बोलले आणि तब्येत बरी असल्याचे सांगत होते. सायंकाळी सासर्‍याने पती रामदास यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये आणले असून तेथे उपचार सुरु असल्याचे सांगितले.

पती रामदास ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना दि. ११ जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास मरण पावले. दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पती रामदास यांचे प्रेत गावी आणले गेले.

दरम्यान, रडताना सासू सीताबाई ही मोठमोठ्याने म्हणत होती, की “माझ्या नवर्‍यानेच माझ्या मुलाचा घात केला. माझ्या काळजाचा तुकडा हिरावला.”

अंत्यविधी झाल्यावर सासूला पतीचे नक्की काय झाले, याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, की दि. ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता रामदास घरी आला.

शेती वाटप करण्यावरुन दोघा बापलेकामध्ये भांडण झाले होते. भांडणे सुरु असताना सासरे लक्ष्मण यांनी पतीला लाकडी दांड्याने डोक्यात, पाठीवर आणि पायावर मारहाण केली होती.

त्यात त्यांच्या डोक्याला मार लागून रक्त आले होते. मारहाण झाल्यावर मुलगा रामदास हा तेथेच झोपला. सकाळी तो उठत नसल्यामुळे त्यास उपचाराकरिता घेऊन गेले होते.

दरम्यान, पती रामदास यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाल्याने ते मरण पावले आहेत. म्हणून सासरे लक्ष्मण धोंडिबा खरात यांच्याविरुद्ध कायदेशीर करावी, अशी फिर्याद देण्यात आली आहे.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24