नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : मायबाप सरकार . आमचं काही चुकतं का? नाही तर आम्हाला मरू द्यावाट पाहून पाहून आमची सहनशीलता आता संपुन गेली तुम्ही काही दाद देत नाही, मग आम्हाला तुमच्या दारातच मरु द्या.

अशी आर्त हाक कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथे एप्रिल ते ऑक्टोबर२०१७ या काळात अवकाळी व अतिवृष्टीमुळे १०१ शेतकऱ्यांच्या फुल शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

कृषी विभागाने त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयांकडे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले होते. त्याला तब्बल २ वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी देखील या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी त्या बाबत कृषी, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

गावातील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ व तुकाराम कातोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर पुणे महामार्गावर दोन महिन्या पूर्वी रास्तारोको आंदोलन केले होते.

त्यावेळी प्रशासनाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी निवेदन स्वीकारून भरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अजुनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, त्याच बरोबर खासदार व आमदार यांनाही लेखी निवेदन दिले होते.

आता मात्र शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून, नुकसान भरपाई मिळण्याची आशा मावळत चालली आहे. कामरगावसह तालुक्यातील सुमारे ३०० शेतकरी या अनुदाना पासून वंचित आहेत.

येत्या पंधरा दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास तहसील कार्यालयापुढे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे,श्रीराम बॉईजचे अध्यक्ष शिवा सोनवणे,जेष्ठ नेते प्रकाश कातोरे, पिंपळगाव कौड्याचे सरपंच सतीश ढवळे, भोरवाडीचे रेवजी जासूद,चैतन्य महापुरे, शुभम माळवे यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रति तहसीलदार,जिल्हाधिकारी व प्रांत कार्यालयाकडे दिल्या आहेत.

नवीन सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे यासाठी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन पाठवले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24