विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा होणार भंडाफोड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- शेत जमीनीच्या वादातून झालेल्या भांडणापोटी सख्खा दीर व भाच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा खोटारडेपणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजने उघडकीस येणार आहे.

सदर फुटेज मिळण्याची मागणी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे या गुन्ह्यात आरोपी ठरलेले रविंद्र भिसे व संतोष पारखे यांनी केली आहे.

तर खोटा गुन्हा दाखल करणार्‍या सदर महिलेवर व खोटी साक्ष देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करुन सदर खटला खारीज करण्याची मागणी करण्यात आली आहे. किसन पारखे व संतोष पारखे हे दोन्ही सख्खे भाऊ असून, त्यांची श्रीगोंदा तालुक्यात वांगदरी येथे शेतजमीन आहे.

दोन्ही भावांमध्ये जागेच्या वादावरुन भांडण झाले होते. या प्रकरणी संतोष पारखे यांने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला किसन पारखे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. किसनला अटक होत नसल्याने संतोष पारखे, रविंद्र भिसे व त्यांची बहिण बायडाबाई भिसे या जिल्हा न्यायालयात दि.16 जानेवारी रोजी आले होते.

सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्या 5 वाजे पर्यंन्त जिल्हा न्यायालयात उपस्थित होते. याचा पुरावा म्हणून त्या दिवशीच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात व कॅन्टीनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये ते आले आहेत.

आपल्या पतीवर गुन्हा दाखल झाल्याचा सुड घेण्यासाठी किसन पारखेंची पत्नी शारदा पारखे (रा.वागंदरी) हीने सख्खा भाचा असलेला रविंद्र भिसे (रा.गुंडेगाव) व दीर संतोष पारखे (रा.वागंदरी) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात सदर महिलेने दि.16 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. वागंदरी येथे विनयभंग केल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल केला आहे. तर याला साक्षीदार म्हणून त्यांचेच नातेवाईक पुष्पा पारखे व अनिता पारखे या आहेत.

मात्र या प्रकरणात गुन्हा ज्यांच्यावर दाखल झाला ते संतोष पारखे व रविंद्र भिसे त्या दिवशी जिल्हा न्यायालयात असल्याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेज मध्ये असल्याची माहिती पक्षकारांचे वकिल अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली आहे.

विनयभंग प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.नि. दौलतराव जाधव तपास करीत असून, ही बाब त्यांच्या निदर्शनास आनून देण्यात आली आहे.तर खोटा खटला खारीज करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी स्पष्ट केले.

खोटा गुन्हा दाखल करणार्‍या सदर महिलेवर व खोटी साक्ष देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संतोष पारखे, रविंद्र भिसे व त्यांची बहिण बायडाबाई भिसे यांनी केली आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Shrigonda