अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या धर्तीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत असावी,
या हेतूने शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहराला दिडशे वर्षांपुर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास अहमदनगरशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराज हे सर्व समाजाची अस्मिता व भूषण आहे.
शहरातील सदरील उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे प्रशासकीय स्तरावर नामकरण होणे हे प्रत्येक नगरकरांची इच्छा आहे. या उड्डाणपूलास कोणत्याही राजकीय पुढार्यांचे नाव देण्यात येऊ नये.
राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने स्थानिक शहरवासियांच्या मागणीचा विचार करून शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने केली आहे.