जामखेड :- तालुक्यातील दत्तवाडी (धोंडपारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी सरोदे (रा.जामखेड) याने शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी जामखेड पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संभाजी कोंडीबा सरोदे तालुक्यातील दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. दि 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सरोदे नान्नजहून जामखेडकडे चारचाकी गाडीने येत होते.
यावेळी राजेवाडी फाटा येथे त्यांच्या शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर खेळत होती. त्यांनी तिला हाक मारली.
शिक्षक बोलवत असल्याने ती विद्यार्थिनी त्यांच्याबरोबर गेली. यावेळी मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
यानंतर मुलीने घरच्यांना ही घटना सांगितल्यावर सदरचा प्रकार उघडकीस आला. सरोदे हा गाडीसह पळून जात असताना ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडितेच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संवर्धन अधिनियम 2012 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करून सरोदे याला अटक करण्यात आली.