राष्ट्रवादी आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी शिवप्रेमींची पुतळा अनावरणाची खोटी आवई उठवत फसवणूक केल्याबद्दल, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या अश्लिल गाण्यावर नाच करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या बद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या शहर काँग्रेसने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी किरण काळे यांनी संग्राम जगताप यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज पोलिसांना दिला आहे. यावेळी काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, खलील सय्यद,

दशरथ शिंदे, प्रवीण गीते पाटील, अनिस चुडीवाला, अनंतराव गारदे, उषाताई भगत, जरिना पठाण, कौसर खान, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, सागर ईरमल, जुबेर सय्यद, रवींद्र पवार, हनीफ जागीरदार, शंकर आव्हाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

फसवणूक झालेल्या शिवप्रेमी, शिवभक्तांच्या वतीने फिर्यादी होण्याची तयारी काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी पोलिसांना दाखविली आहे. संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असतानाच काँग्रेसने म्हटले आहे की, त्यादिवशी घडलेले कृत्य व कायदा उल्लंघन हे इसम नामे संग्राम अरुण जगताप याने व त्याच्या साथीदारांनी संगनमताने केले आहे.

सबब अन्य कोणतीही धार्मिक संघटना, समस्त समाज, तसेच शिवप्रेमी व शिवभक्तांवर कोणत्याही स्वरूपाचा गून्हा दाखल करू नये. कारण इसम संग्राम अरुण जगताप याने सर्वांचीच फसवणूक आपल्या साथीदारांसह संगनमत करून केलेली आहे.

त्यामुळे निर्दोष संघटना, समस्त अखंड हिंदू समाज, शिवप्रेमी व शिवभक्तांवर गुन्हा दाखल करून अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी मागणी काळे यांनी पोलिसांकडे केली आहे.

जगताप यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी काँगेसने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास माळीवाडा एसटी स्टँड लगत असणाऱ्या तमाम शिवप्रेमींचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची खोटी आवई उठवत शिवप्रेमींची फसवणूक शहराचा आमदार संग्राम अरुण जगताप या इसमाने केली आहे.

यासाठी विविध जाहिरात माध्यमांचा गैरवापर करत शिवप्रेमींमध्ये पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा खोटा संदेश पसरवून गर्दी जमवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्याच पुतळ्याचे लोकार्पण करून शिवप्रेमींची फसवणूक केली आहे.

शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर “चुम्मा, चुम्मा दे दे…” सारखी अश्लिल गाणी साऊंड सिस्टिमच्या डेसिबल नियमांचे उल्लंघन करत कर्कश आवाजात वाजवत या सारख्या अश्लील गाण्यावर आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवत स्वतः विकृतरित्या नाच करत संग्राम अरुण जगताप या इसमाने लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

यामुळे नगर शहरासह सबंध महाराष्ट्रामध्ये समस्त शिवप्रेमी व शिवभक्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की, यावेळी कायद्याचे उल्लंघन करीत विनापरवाना साऊंड सिस्टिमचा वापर करीत निर्धारित डेसीबल पेक्षा कितीतरी जास्त पटीने डेसीबल क्षमतेच्या ध्वनिक्षेपकावरून संग्राम अरूण जगताप

या इसमाने स्वतः भाषण केले असून याच ध्वनिक्षेपकावरून श्रद्येय छत्रपति शिवाजी महाराजांपेक्षा ही आपण स्वतः मोठे आहोत हे भासविण्यासाठी महाराजांच्या जयघोषाच्या बरोबरीने स्वतःच्या नावाने घोषणाबाजी करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करत “संग्रामभैया तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !” अशी घोषणाबाजी केली आहे.

यामुळे शिवप्रेमींच्या व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व परिसर सुशोभीकरणाचा खर्च अहमदनगर महानगरपालिका या शासकीय असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुतळा नूतनीकरण २०२१-२०२२ या लेखाशीर्षकातून करण्यात आलेला असून

तशी निविदा व ठेका दिल्याची ऑर्डर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आली असताना देखील शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या संग्राम अरुण जगताप या इसमाने स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आपल्या स्वतःच्या हातून करत कायद्याचे उल्लंघन केले आहे.

यावेळी संग्राम अरुण जगताप या इसमाने स्वतः मास्क परिधान केलेला नव्हता. यामुळे कोरोना या महामारी पसरविणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सदर घटना घडून दोन ते तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी देखील कायद्याचे उल्लंघन झाल्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई व गुन्हा दाखल न झाल्यामुळे

समाजामध्ये चुकीचा संदेश जात असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत शहरातील शांतता बाधित होते की काय अशी चर्चा सबंध शहरभर सुरू आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक ती कडक पाऊले अति तातडीने उचलण्याची आवश्यकता असल्याचे कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सबब संग्राम अरुण जगताप, कार्यालय पत्ता – आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर या इसमाच्या विरोधात शिवप्रेमींची फसवणूक करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लिल गाण्यांवर हिडीस नाच करत शिवप्रेमींच्या भावना दुखावणे,

शासकीय प्रोटोकॉल धुडकावत कायद्याचे उल्लंघन करणे, जास्त डेसिबल क्षमतेच्या साऊंड सिस्टिमचा भाषणासाठी आणि अश्लील गाणी वाजवण्यासाठी उपयोग करणे, विनापरवाना बेकायदेशीररित्या गैरजमाव गोळा करणे, पुतळा परिसरामध्ये घाण पसरवित परिसराची विटंबना करणे,

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणे याबाबत गंभीर कलमान्वये इसम नामे संग्राम अरुण जगताप यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार किरण काळे यांनी काँग्रेसच्यावतीने कोतवाली पोलीस पोलिसांकडे केली आहे. तक्रारीच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, अहमदनगर शहर विभाग यांना देखील देण्यात आल्या आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe