अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- करमणूक जगतात आपला ठसा उमटवलेल्या ‘शेमारू एंटरटेन्मेंट’ने नवी भरारी घेत खास मराठी सिनेरसिकांसाठी ‘शेमारू मराठीबाणा’ हे फक्त मराठी चित्रपट व नाटकांना वाहिलेले चॅनल सुरू केले आहे.
नुकताच एका झगमगत्या सोहळ्यात त्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मराठी चित्रपट जगतातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
यात सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर, अविनाश खर्शीकर, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि संगीतकार चिनार-महेश, निलेश मोहरीर आदी कलाकारांचा समावेश होता.
मराठी रसिकांचे मनोरंजन हाच मुख्य उद्देश ठेवून सुरू करण्यात आलेल्या या चॅनलवर महाराष्ट्र व गोव्यातील प्रेक्षकांना उत्तमोत्तम मराठी चित्रपट व नाटकं बघता येणार आहेत.
अगदी अलीकडच्या, अभिजीत खांडकेकर अभिनीत ‘भय’ या चित्रपटापासून ते जुन्या जमान्यातले लोकप्रिय नायक रमेश देव यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम आंधळे असते’ या चित्रपटापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट या चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध असतील. त्यात ‘आपला माणूस’, ‘पोश्टर गर्ल्स’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असेल.
या व्यतिरिक्त अनेक मराठी दर्जेदार नाटकांचे प्रसारण हे या टीव्ही चॅनलचे वेगळेपण असणार आहे. या शानदार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेला सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी यावेळी बोलताना म्हणाला, ‘शेमारू गेली काही दशकं आपलं सगळ्यांचं मनोरंजन करत आली आहे आणि मी त्या प्रवासाचा केवळ एक साक्षीदारच नव्हे, तर हिस्सा राहिलो आहे.
मराठी सिनेजगत तसेच बॉलिवूडमधील ते एक महत्त्वाचे घटक असून, आज ते लाँच करत असलेल्या ‘शेमारू मराठीबाणा’च्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद होत आहे.
‘मराठी बाणा’ या नावातच अभिमान व एकात्मता अंतर्भूत आहे आणि मला खात्री आहे की, हे चॅनल आपल्याला आपल्या मुळांकडे अभिमानाने परत जायला आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी नाते जोडायला भाग पाडणारे माध्यम ठरेल.
Web Title – New Marathi Movie Channel is coming forMarathi audiences