पाथर्डी – नवे लग्न झाल्यानंतर देव दर्शनासाठी नवर्याबरोबर आलेल्या नववधूने प्रियकराबरोबर पलायन केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,तीन दिवसांपूर्वी विवाहाबद्ध झालेली वधुवराची जोडी मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी आली.
दरम्यान मोटरसायकलवरून देवदर्शनासाठी आलेल्या या नवदांपत्याच्या पाठीमागेच या नववधूचा प्रियकर सुद्धा मढी येथे येऊन पोहोचला.
नियोजनाप्रमाणे नवरीने नवर्याला मोटरसायकल वाहनतळाच्या एका टोकाला लांब उभी करण्यास सांगितले.
देवाच्या दारात बायकोचा आग्रह न मोडता नवर्याने गाडी देवस्थान वाहनतळच्या आतील बाजूस काही आंतरावर नेऊन लावली.
गडाच्या पायर्या उतरताना नवरा पुढे नवरी मागे अन काही अंतरावर प्रियकर पायर्या उतरत होता. त्याचवेळी खाणाखुणा दोघांमध्ये सुरू होती.
नियोजनाप्रमाणे नवरी वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर थांबली. नवरा मोटारसायकल आणण्यासाठी गेला असता
त्याच दरम्यान मागून आलेल्या प्रियकराने नववधू असलेल्या आपल्या प्रेयसीला स्वत:च्या मोटरसायकलवर बसवून मढीतून धूम ठोकली.
दोन मिनिटांनी गाडी घेऊन आलेला नवरदेव जेथे नवरी उभी होती त्या प्रवेशद्वारा जवळ आला. इकडे तिकडे चोहीकडे नजर फिरवली.
त्याला आपली नववधू दिसली नाही. तो कावरा बावरा झाला. घामाने डबडबून गेला. त्याने दुकानदाराकडे चौकशी केली.
पण भाविकांच्या वर्दळी पुढे कोणाचे लक्ष नव्हते. नंतर खरा प्रकार लक्षात येताच उपस्थित भाविक भक्तांनी नवरदेवाला धीर दिला. त्याने नातेवाईकांना फोन लावले.
त्यांच्या भाषेत नवरी पळून गेल्याचे सांगितले. नवरदेव व नातेवाईकांनी सीसीटीवी फुटेज बघून चेहरा न दिसणार्या प्रेयकराला ओळखले सुद्धा; परंतु पोलिसांत मात्र तक्रार दाखल झाली नाही.