नगर : नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गवर देवगड फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
ताराबाई संतोष वणवे (वय ५३, रा.आडगाव, जि. जळगाव) व मंगल सुनिल काळे (वय ४५, रा.निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर) अशी मृत महिलांची नावे आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरजवळील भानवाडी येथे चालले होते. दुपारी बाराच्या सुमारास वऱ्हाडातील एक टेम्पो देवगड फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर थांबला होता.
यामधील काही महिला रस्ता ओलांडत असताना एका कारने त्यांना जोराची धडक दिल्याने यातील ताराबाई संतोष वणवे (वय ५३) व मंगल सुनिल काळे (वय ४५) या जबर जखमी झाल्या.
त्यांना नेवासा फाटा येथिल ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचे सांगितले. टेम्पोतील सर्व वऱ्हाडींच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने त्या सर्वांना मोठा धक्का बसला.
ज्या गाडीने धडक दिली ती गाडी पसार झाली आहे. यावेळी या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या खबरीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.