भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करतोय – पंतप्रधान मोदी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मथुरा : दहशतवाद एक वैश्विक समस्या बनली असून तिने जणूकाही विचारसरणीचे रूप धारण केले आहे. अशातच आमचा शेजारी देश (पाकिस्तान) दहशतवादाला पोसत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली आहे.

भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करीत असून, भविष्यातही करणार असल्याचे त्यांनी ठणकाविले आहे.

उत्तरप्रदेशातील पशुधन रोग निर्मूलन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, अतिरेक्यांना आश्रय देणे व प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण भारत प्रयत्नशील आहे.

अनेकदा आम्ही दहशतवादी कारवाया हाणून पाडल्या आहेत; परंतु आजघडीला दहशतवाद एक विचारधारा बनली आहे. तिने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. एवढेच नव्हे, तर दहशतवाद एक वैश्विक समस्या बनून आ वासून उभी ठाकली आहे.

त्यातच आमचा शेजारी देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्यांच्या देशात अतिरेकी मोकाट आहेत. त्यामुळे संपूर्ण विश्वाने एकजूट दाखवीत अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.

अतिरेकी संघटनांची नावे बदलली तरी त्यांच्या वाईट कृत्यावर पडदा पडणार नाही. समस्या प्रदूषणाची असो वा आजारपणाची, त्यावर मात करणे शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24