जयपूर : राजस्थान सरकारने महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुटखा व पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक व विक्रीवर निर्बंध घातल्याची माहिती बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांनंतर राजस्थान हे गुटखा व पान मसाल्यावर बंदी घालणारे तिसरे राज्य ठरले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
युवकांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी हा ठोस निर्णय घेण्यात आला आहे.अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम कॉर्बोनेट, निकोटीन, तंबाखू व खनिज तेलाचा समावेश आहे का, याची पडताळणी करण्याची जबाबदारी ‘केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा राजस्थान’द्वारे करण्यात येणार आहे.
अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काळ्या बाजारात विक्री होणारा पान मसाला व गुटख्यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी दिली.