श्रीरामपूर : लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने शहरातील आंबेडकरी चळवळ तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी याबाबत आमदार सुधीर तांबे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
तसेच स्थानिक उमेदवार नसल्यामुळे व त्यांचा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क नसल्याने काँग्रेस पक्षाला श्रीरामपूरची निवडणूक जड जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. भाऊसाहेब कांबळे यांचे शिक्षण जरी कमी असले तरी त्यांच्यामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. गेल्या दहा वर्षात त्यांनी स्वतःचा गट कधी निर्माण केला नाही.
ससाणे गटाने जरी त्यांच्या विरोधी भूमिका घेतलेली असली तरी सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने तालुक्यातील लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे , चंद्रशेखर कदम, प्रकाश चित्ते, रावसाहेब खेवरे, सचिन बडधे , डॉक्टर शिरसागर आदींच्या सहकार्याने त्यांनी प्रचाराची रणनीती आखली असून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सुद्धा स्थानिक उमेदवाराला मदत करण्याची भूमिका अशोक कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केली होती.
त्यानुसार मुरकुटे गट ही कांबळे यांचे काम करण्याची शक्यता आहे. तालुका पंचायत समितीचे सभापती दिपकराव पटारे यांनी सुद्धा विखे यांच्या आदेशानुसार भाऊसाहेब कांबळे यांचे काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांबळे यांचे पारडे जड झाले असून त्यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आज तरी मतदारसंघात दिसत आहे.