श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.
त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नर्सरी, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, करजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, मोरवाडी, फत्याबाद, गळनिंब, उक्कलगाव, बेलापूर खुर्द, पढेगाव,
भेर्डापूर, कारेगाव, मातापूर निपाणीवडगाव येथे आयोजित जाहीर सभांमध्ये श्री.मुरकुटे बोलत होते. त्यांचेसमवेत लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, काशिनाथ गोराणे, अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब हळनोर, जि.प.सदस्य शरद नवले, भाजपाचे बबनराव मुठे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सनी बोरुडे, विठ्ठलराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.