श्रीरामपूर मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु होण्यासाठी आ.कांबळे यांना विजयी करा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर  ;- जोपर्यंत प्रवरा नदीकाठ ते राहुरी फॅक्टरी पर्यंतच्या भागातील शेती समृद्ध होती तोवर राहुरी तालुका आणि राहुरी कारखाना प्रगतीच्या वाटेवर होता. मात्र आपला भाग सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावला तशी आपल्या भागाची दुर्दशा झाली.

ऊसाची शेती गेली. त्याचबरोबर समृद्धी गेली. एकेकाळचे बागायतदार शेतकर्‍यांवर जिरायतदार शेतकरी बनण्याची वेळ आली. हे चित्र पालटायचे या निर्धारानेच मी आणि ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी झाले गेले विसरुन एकत्र येण्याचा आणि महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना निवडून आणण्याचा निर्णय केला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

शिवसेना-भाजप व मित्रपक्ष महायुतीचे प्रचारार्थ गोवर्धन, सराला, महांकाळवाडगाव, माळेवाडी, उंबरगाव, लाडगाव, मालुंजा बु॥, रामगड, मांजरी, टाकळीमियॉ, देवळालीप्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे आयोजित जाहीर सभांमध्ये श्री.कांबळे बोलत होते.

त्यांचेसमवेत लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, माजी सभापती सौ.सुनिता गायकवाड, ‘अशोक’ चे संचालक अभिषेक खंडागळे, जि.प.सदस्य शरद नवले, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब तोरणे, गणेश भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर तालुक्यातील व राहुरी तालुक्यातील 32 गावांमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या हक्काचा आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून आ.कांबळे यांची निवड करण्यात आली असल्याचे श्री.मुरकुटे यांनी सांगितले.

श्री.मुरकुटे म्हणाले की, प्रवराकाठच्या गावांसह राहुरी फॅक्टरीपर्यंतचा परिसर हा नंदनवन होता.मात्र समन्यायी पाणी वाटप कायदा सन 2005 मध्ये उरावर बसला आणि आपले वाटोळे झाले. ऊसाची शेती उध्वस्त होऊन राहुरी कारखाना बंद पडला.

त्याचा परिणाम देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठा ओस पडण्यात व कामगारांचे प्रपंचाची धुळधाण होण्यात झाला. श्री.विखे यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरु झाला तरी पाटपाण्याच्या अशाश्वतेमुळे भवितव्य टांगणीवरच आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अर्थकारण पूर्णत: शेती व दूध व्यवसायावर अवलंबून आहे. श्रीरामपूर व राहुरी तालुक्याला पुन्हा पूर्वीचे दिवस दाखवायचे या उद्देशाने मीच आ.कांबळेंना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. पाटपाण्याचे धोरणही ठरलेले नाही.

यामुळे अशोक व राहुरी कारखाना परिसरात चिंतेचे तसेच निराशेचे वातावरण आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यावर वेगळा कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. निळवंडे ते ओझरपर्यंतच्या प्रस्तावित प्रोफाईल वॉल्स जर झाल्या तर प्रवरा नदीपात्रातील को.प.बंधारे कोरडे पडून नदीकाठ उजाड होणार आहे. हा डाव उधळून लावणे हा आमचा निर्धार आहे. त्यासाठी श्री.विखे, आपण व श्री.कांबळे वचनबद्ध असल्याचे श्री.मुरकुटे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24