लाहोर : पाकिस्तानच्या लियाकतपूर भागात गुरुवारी रावळपिंडीला जात असलेल्या तेजगाम एक्स्प्रेस रेल्वेगाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ७३ जण ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. आगीमुळे रेल्वेचे तीन डबे पूर्णपणे खाक झाले. काही यात्रेकरू नाष्ट्याची तयारी करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.
रहीम यार खानचे जिल्हा पोलिस अधिकारी आमिर तैमूर खान यांनी सांगितले की, ही दुर्घटना पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील रहीम यार खान या शहराजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी तेजगाम एक्स्प्रेस कराची येथून रावळपिंडीला जात होती. त्याच वेळी एका प्रवाशाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हा स्फोट झाला तेव्हा प्रवासी नाष्ट्याची तयारी करत होते.
पाकिस्तान रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज अहमद यांनी सांगितले की, या घटनेमुळे रेल्वे वाहतूक फारशी प्रभावित झाली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमी प्रवाशांना चांगल्या उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.