संगमनेर : आयुर्विम्याचा चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवत येथील वैद्यकीय व्यावसायिकाला चार ठगांनी ५५ लाखांना गंडा घातला.
संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता वर्मा, निधी गुप्ता, नरेंद्र मौर्या आणि विकास (पूर्ण नाव माहिती नाही) अशी आराेपींची नावे आहेत.
अर्जुन भागुजी ठुबे (वय ५८, साकूर, संगमनेर) असे तक्रारदार वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर २०१७ पासून १५ जानेवारी २०१९ पर्यंत फसवणुकीचा प्रकार सुरु होता. आरोपींनी या वैद्यकीय व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क करत त्यांचा विश्वास संपादन केला.
ठुबे यांनी काढलेल्या आयुर्विम्याचा परतावा मिळण्यासाठी व त्यात फायदा होण्यासाठी तसेच जीएसटी, एनओसी, पॉलिसी रिन्युअल अशा कारणांसाठी रक्कम भरावी लागेल असे सांगून वेगवेगळ्या खात्यांवर एनईएफटीद्वारे व रोखीने पैसे दिले. ही रक्कम तब्बल ५५ लाखांच्या घरात आहे.